देशभरातील जन आंदोलनांच्या वतीने नफरत छोड़ो संविधान बचाओ अभियाना अंतर्गत देशातील सुमारे ५०० जिल्ह्यात प्रत्येकी किमान ७५ कि.मी. पदयात्रा काढून जनसंवाद सुरू आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात महात्मा फुले स्मृती दिन २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्ये पर्यंत नफरत छोड़ो संविधान बचाओ यात्रा काढण्यात येणार आहे. ही माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खुद्द सरकार कडूनच आघात केला जात आहे. कामगार वर्गाला देशोधडीला लावण्यासाठी कामगार कायदे बाद करून लेबर कोड आणले आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलती कमी केल्या जात आहेत.ईडी, सीबीआय आणि न्याय यंत्रणा आदी संस्थांचा गैरवापर करून विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांना जेल मध्ये कोंडले जात आहे. महिला आणि दलितांवरील अन्याय अत्याचार वाढतआहेत.बेरोजगारी ,महागाई प्रचंड गतीने वाढत आहे. देशात अप्रत्यक्षपणे हुकूमशाही गाजवली जात आहे, धर्मांध आणि सामाजिक सदभाव बिघडवण्यासाठी सत्तेचा गैरवापर हा लोकशाही तसंच संविधानावर वर आघात आहे. अश्या परिस्थितीत सामाजिक जनसंघटनांची आणि जनतेची जबाबदारी वाढली असून समाजात सलोखा आणि एकजुटीने या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी ही यात्रा देशभर आयोजित करण्यात येत असून जिल्ह्यात होत असलेल्या या अभियानात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन ‘नफरत छोडो संविधान बचाओ’ या यात्रेचे ठाणे जिल्हा निमंत्रक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी केलं आहे. जिल्हयातील ही यात्रा २८ नोव्हेंबर रोजी भिवंडीतून जेष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत होणार्या जाहीर सभेने सुरू होईल. भिवंडी – महापोली – कासणे – शहापूर – मुरबाड – अंबरनाथ – वालधुनी – ठाणे या मार्गाने जाऊन यात्रेचा समारोप ५ डिसेंबर रोजी होईल अशी माहिती देण्यात आली.
