दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ आढळल्यास कडक कारवाईचा इशारा

दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी दिपक खांडेकर यांनी दिली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात सुशील डेअरी, विष्णू नगर, येथे अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे, अन्न सुरक्षा अधिकारी रा.सि.बोडके आणि वैधमापन विभागाचे एस.बी.जाधव यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. सिटी डेअरी, पाचपाखाडी, येथे अन्न सुरक्षा अधिकारी रा.धों.आकरुपे यांच्यासह रा.वि.करडक आणि विकास अधिकारी क्रिष्णा महाळुंगे यांनी आणि विधी डेअरी, वागळे इस्टेट, येथे अन्न सुरक्षा अधिकारी आय.एन.चिलवंते आणि पशुसंवर्धन विभागाचे आतिश काशीद यांनी तसेच मनीषा डेअरी फॉर्म, कासारवडवली, येथे अन्न सुरक्षा अधिकारी रा.धों.आकरुपे आणि वैधमापन निरीक्षक नितीन गोस्वामी यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर समितीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पहावे. दोषी व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जनतेला भेसळमुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळणे, ही आपली जबाबदारी आहे, असे दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यस्तरीय बैठकीत सूचना दिल्या होत्या. या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीने धडक कारवाई सुरू केली असून विभागातर्फे जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत भेसळ आढळल्यास तात्काळ एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading