आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात एक अनोखी खगोलीय घटना दिसणार आहे. तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची अनोखी युती आज संध्याकाळनंतर खगोल प्रेमींना पाहता येईल. कपाळावरील चंद्रकोरी प्रमाणे पश्चिम आकाशात हा अद्भुत नजारा पहायला मिळणार आहे. आज चंद्रकोरीच्या बरोबर खाली शुक्राची तेजस्वी चांदणी दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रमाणे कपाळावर चंद्रकोर लावत असत,मराठमोळ्या स्त्रिया आपल्या सौभाग्याचे कुंकू म्हणून कपाळावर ज्या प्रमाणे चंद्रकोर लावतात,अगदी तशीच आजची चंद्रकोर आणि त्याखाली तेजस्वी शुक्राची चांदणी दिसणार आहे.या खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी खगोल प्रेमींनी संध्याकाळी सव्वा सात ते पावणे आठ पश्चिम आकाशात निरिक्षण केल्यास हे पहायला मिळणार आहे. ८ वाजल्यानंतर चंद्र आणि शुक्र मंद होत जातील,असे तारांगण ग्रुपचे खगोल अभ्यासक दीपक आंबवकर यांनी कळविले आहे.