तरूणाईला वाहतूक नियमांचं महत्व पटवून देण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा होणार वापर

तरूणाईला वाहतूक नियमांचे महत्व पटवून देण्यासाठी ठाणे पोलीस आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मदत घेणार आहेत. सुशिक्षित आहात सुजाण बना असा संदेश देत वाहतूक पोलीसांनी रस्ता सुरक्षा जीवन रक्षा या अभियानाला सुरूवात केली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान एक महिना चालणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानात तृतीय क्रमांक मिळवणारा ठाणे वाहतूक विभाग तरूणाईपर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक विभाग फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मदत घेणार असून यासाठी तयार करण्यात आलेल्या फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामचा शुभारंभ करण्यात आला. अभिनेता मंगेश देसाई याची वाहतूक पोलीसांचा सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठीत कलाकारांच्या मदतीने वाहतूक विभागाचे नियम नवीन पिढीला समजावून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय काम करणा-यांचा खास गौरव करण्यात आला. वाहतूक सांभाळण्यापासून ते गरजू मजूर, गरोदर महिला, कोरोना रूग्ण यांना मदत, भुकेलेल्यांना अन्न देण्याच्या दृष्टीनं उल्लेखनीय काम केलेल्या योध्द्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. वाहतुकीची शिस्त घरोघरी पोहचवण्यासाठी एका विशेष दिनदर्शिकेचं यानिमित्तानं अनावरण करण्यात आलं. कोरोना काळात रस्त्यावर पोलीस उभा होता म्हणून कोरोनाची झळ आपल्यापर्यंत पोहचली नाही असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी काढले तर कोरोनाच्या काळात आम्ही लागेल ती मदत पालिकेला केली असली तरी पालिका आणि वैद्यकीय कर्मचा-यांनी केलेल्या प्रयत्नांची शिकस्त म्हणून हा दुर्धर रोग आटोक्यात आला असं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं. कोरोना काळात ३३ पोलीसांचा मृत्यू झाला त्याची कमतरता कधीही भरून येणार नाही अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली. काही पोलीसांना प्रातिनिधिक स्वरूपात कोविड लस देण्यात यावी अशी मागणी पोलीस आयुक्तांनी यावेळी केली त्यावर सर्व पोलीसांना लवकरच कोविड लस दिली जाईल अशी ग्वाही महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading