ठाण्यामध्ये रात्रभर तुफान पाऊस

ठाण्यामध्ये काल रात्रभरात १८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री झालेल्या या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. कोपरी, खोपट, दिवा, किसननगर, वागळे इस्टेट, मुंब्रा, कळवा, सावरकरनगर, विटावा, उथळसर अशा १८ ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. नाले तुडुंब वाहत असल्यामुळं नाल्याच्या बाजूला राहणा-या रहिवाशांच्या घरात पाणी जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. काल रात्री साडेनऊ नंतर पावसाला सुरूवात झाली. साडेनऊ ते साडेदहा या एक तासात साधारणत: १५ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा या वेळेत २१ मिलीमीटर पाऊस झाला. दीड ते अडीच या काळात जवळपास ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अडीच ते साडेतीन या वेळेत २४ मिलीमीटर पाऊस झाला तर साडेतीन ते साडेचार या वेळेत जवळपास ९ मिलीमीटर पाऊस झाला. असा साडेनऊ पासून रात्री साडेचार पर्यंत या काळात १८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत एकूण १७०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर गेल्यावर्षी याच काळात १३०७ मिलीमीटर पाऊस झाला होता. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून ठिकठिकाणी सामान्य रहिवाशांचे हाल होत असतानाच ज्या ठिकाणी पाऊस पडणं आवश्यक आहे अशा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसल्यामुळे मात्र लोकांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे. कारण धरणांच्या पाणलोट क्षेत्रात म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे नजिकच्या काळात पाणी टंचाईची टांगती तलवार लटकत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading