ठाण्यामध्ये चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी साजरी केली जाते. जेजुरीमध्ये यानिमित्त खंडोबाचा मोठा उत्सव साजरा होतो. ठाण्यात जुन्या महापालिकेच्या मागे खंडोबाचं देऊळ आहे. या देवळात चंपाषष्ठी निमित्त खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. खंडोबाला अर्पण केल्या जाणा-या नैवेद्यामध्ये भरीत आणि रोडगा असतो. खंडोबाची तळी भरून आरती केली जाते. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांनी मिळालेल्या वराच्या जोरावर अनेकांना त्रस्त केलं होतं. या दैत्यांचा पराभव करून खंडोबानं लोकांना संकटमुक्त केलं. याचं ऋण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.