ठाण्यात रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवून रिक्षामध्ये राहिलेल पोलिसाचे पाकीट केले परत

ठाण्यात रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवून रिक्षामध्ये राहिलेल पोलिसाचे पाकीट परत केले. पोलीस हवालदार रोडेकर नेहमीप्रमाणे नवीमुंबई पोलीस आयुक्तालयात कर्तव्यावर निघाले होते. त्यासाठी गुरूकुल सोसायटी परिसरातून ते रिक्षामध्ये बसले. गावदेवी मंदिराजवळ उतरताना त्यांना एक फोन आला. फोनवर बोलत ते रिक्षाचे भाडे देत होते. त्यावेळी सुट्टे पैसे काढताना त्यांचा पाकीट रिक्षामध्ये राहून गेले. गडबडीत पोलीस हवालदार रोडेकर हे लोकल पकडण्यासाठी गेले. लोकलमध्ये बसल्यावर पाकीट पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. याचदरम्यान रिक्षाचालक साळुंखे यांना रिक्षाच्या मागील सीटवर पाकीट दिसले. पाकिटमध्ये पैसे आणि पोलीस आय कार्ड आणि इतरही कार्ड होते. त्यांनी ही बाब तातडीने माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या कानावर घातली. तर जगदाळे यांनी ठाणे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांना सांगितली. सह पोलीस आयुक्त कराळे यांनी पाकीट त्यांच्या कार्यालयात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार साळुंखे यांनी पाकीट जाऊन सह पोलीस आयुक्त कार्यालयात जमा केले. अशाप्रकारे काही तासात ते पाकीट सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून नवीमुंबई पोलिसाला मिळाले. याप्रसंगी कार्यालयीन कर्मचारी पोलीस हवालदार सुनील शेळके,पोलीस नाईक सचिन पाटील यांच्यासमवेत रिक्षाचालक सुनील साळुंके आणि त्यांचा मुलगा ही उपस्थित होता. तर सह पोलीस आयुक्त कराळे यांनी रिक्षाचालक साळुंखे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading