ठाण्यात येत्या ६ जानेवारीपासून संस्कार विज्ञान सोहळ्याचं आयोजन

ठाण्यात येत्या ६ जानेवारीपासून संस्कार विज्ञान सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. लोणावळ्यातील मनशक्ती प्रयोगकेंद्र ही सामाजिक संस्था असे उपक्रम राबवत असते. या संस्थेचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी जन्मपूर्व संस्कारापासून माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर भेडसावणाऱ्या समस्यांचा, सुख-दुःखांचा अभ्यास केला. २८ विज्ञानशाखा, धर्म, तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून त्यांनी जीवनोपयागी ‘न्यू वे’ तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या या अभ्यासाचा समाजाला उपयोग व्हावा आणि समाज स्वावलंबी व्हावा म्हणून मनशक्ती प्रयोगकेंद्रातर्फे ठाण्यात संस्कार विज्ञान सोहळा हा कार्यक्रम ६ ते ९ जानेवारी या काळात होणार आहे. सीकेपी हॉल आणि एनकेटी कॉलेज हॉल या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उपक्रमांची आखणी केली आहे. कार्यक्रमाचे उद्‌घाटन ६ जानेवारी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे संदीप वासलेकर असतील. शनिवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान ‘सन्मान सत्कृत्याचा’ ह्या सत्रात होणार आहे. श्यामश्री भोसले, रती भोसेकर, गणराज जैन, प्रसाद कर्णिक, गीता शहा, सतीश धुरत, भटू सावंत, डॉ.उल्का नातू यांचा यावेळी सत्कार होणार आहे. रविवारी युवकांसाठी -दीपस्तंभांच्या शोधा हे युवा संवाद सत्र होणार आहे. या उपक्रमात युवा समाजसेवक अमृत अभय बंग, निलेश खरे आणि प्रवीण दवणे संवाद साधणार आहेत. तर समारोप समारंभात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, प्रमुख पाहुणे दीपक घैसास ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ, समारंभाचे अध्यक्ष विजय कुवळेकर हे असतील.
याशिवाय, दररोज विविध विषयांवर विनामूल्य विवेचने असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त अभ्यासयश, पालकांसाठी विवेकी पालकत्व, तरुणांसाठी यौवनातील महत्वाकांक्षा, मोठ्यांसाठी कुटुंबसौख्य, ताणव्यवस्थापन, मत्सरघात आणि वास्तुशुद्धी, मनोधैर्यासाठी ध्यान, १ ते ७ वयोगटातील मुला-मुलींच्या पालकांसाठी बालकाची मेंदूक्रांती, गर्भधारणेच्या पूर्वतयारीसाठी सुप्रजनन, ज्येष्ठांसाठी सुखद जीवनसंध्या विषय हाताळले जाणार आहेत. वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. मनशक्ती केंद्राचे वैशिष्ट्य असलेल्या माइंड जिम प्रकल्पातील माइंड ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज प्रत्यक्ष पाहायला आणि करायला मिळणार आहेत. मानस यंत्र चाचण्यांमध्येही सहभाग घेता येईल. चाचणी झाल्यावर त्याचा रिझल्ट दिला जाईल व त्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. विविध विषयांवरील प्रदर्शन आणि ग्रंथ साहित्य प्रदर्शनही असणार आहे. गर्भसंस्कार, सुजाण पालकत्व, आरोग्य प्राप्ती, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शिवाय सर्वकल्याणासाठी सामुदायिक सत्यपूजा, ३ ते ६ वयोगटातील मुले-मुली आणि पालकांसाठी मेधासंस्कारही आयोजित केले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading