ठाण्यात फूटबॉलचा आवाज घुमणार

वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा फूटबॉल संघटनेच्या प्रभारी प्रशासकीय समितीतर्फे प्रशिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मुलभूत प्रशिक्षण शिबिराची नुकतीच सांगता झाली. मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलात तीन दिवस झालेल्या या शिबीरात २१ युवा नवोदित प्रशिक्षक सहभागी झाले होते. भारताचा माजी गोलरक्षक दिनेश नायर, ज्येष्ठ फूटबॉल पटू मंगेश देसाई यांनी या शिबीरात मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षण शिबीरात या युवा प्रशिक्षकांना, लहान फूटबॉल पटूंना खेळवायचं कसं, त्यांच्यामध्ये फूटबॉलची गोडी कशी निर्माण करायची, खेळ आणि अभ्यास सांगड कशी घालायची, शिस्तबध्द खेळ कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. संघटनेत असलेल्या वादामुळे गेली ३७ वर्ष जिल्ह्यात फूटबॉल खेळाला चालना मिळाली नव्हती. संघटनेत आपलंच वर्चस्व असावे यामुळे निर्माण झालेल्या वादाने कधी न्यायालयाची पायरी गाठली हे कोणालाच कळले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील फूटबॉलचे मोठे नुकसान झाले. अव्वल दर्जाचा स्पर्धात्मक फूटबॉल खेळायला मिळावा म्हणून जिल्ह्यातील फूटबॉल पटू मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्यातील संघांचा आसरा घेत होते. खेळाडूंची होत असलेली ही परवड आणि जिल्ह्यातील फूटबॉल पटूंना न्याय मिळावा म्हणून राज्यातील पालक संघटना असलेल्या वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशननं पुढाकार घेतला. जिल्ह्यासाठी विफाच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समितीची स्थापना केली आणि या समितीला जिल्ह्यात सामने, रेफ्री, प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यास सांगितले आहे. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबीराच्या सांगता समारंभास विफाचे सचिव सौतूर वाझ, विफा ठाणए जिल्हा प्रभारी प्रशासकीय समितीचे प्रमुख प्यारेलाल चौधरी, समन्वयक सायमन पात्रोव्ह उपस्थित होते. समितीतर्फे खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी प्रथमोपचार शिबीर आणि रेफ्री मार्गदर्शन शिबीर आणि पहिल्या ठाणे जिल्हास्तरीय वरिष्ठ गटाच्या साखळी सामन्याचं आयोजन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading