ठाण्यात आवाज तपासणी द्वारे कोरोना निदान या संशोधन प्रकल्पास परवानगी द्यावी – महापौर

ठाण्यात आवाज तपासणी द्वारे कोरोना निदान या संशोधन प्रकल्पास परवानगी द्यावी असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. पालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे त्यांनी हे निर्देश दिले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी अनेक उपचार पध्दती पुढे येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एखाद्या व्यक्तीला करोनाची तपासणी करण्याकरिता आवाज आणि श्वसन निदान पध्दती पुढे येत आहे. या पध्दतीमध्ये करोना संशयीत सर्वसामान्य व्यक्तींनी घरच्या घरीच आपल्या नियमित आवाज आणि श्वसनामध्ये काही बदल झाले असल्यास त्याची नोंद स्वत:च्याच मोबाईलमध्ये करुन कोणत्याही रुगणालयात वा लॅबमध्ये न जाता केवळ ई-मेलद्वारे वॉईस किल्नीकला पाठविल्यास केवळ 20 ते 25 ‍मिनीटात या व्यक्तीच्या आवाजाच्या काही पॅरामीटर्सच्या बदलातून श्वसन संस्थेवर काही परिणाम झाला आहे का हे कळू शकते. ठाण्यातील डॉ. आशिष भूमकर आणि सोनाली लोहार यांच्या हेल्थ को हिअरिंग स्पीच ॲण्ड फिलीओक्लोनिकच्या माध्यमातून ठाणे हेल्थ केअर या रुग्णालयात आवाज आणि श्वसन पध्दतीचा अवलंब करुन कोरोनाची तपासणी करण्याचे संशोधन सुरू केले आहे. अशाच प्रकारचं संशोधन प्रकल्प मुंबई महानगरपालिकेत देखील प्रस्तावित आहे, ज्याद्वारे 1 हजार व्यक्तींची तपासणी करणे शक्य होणार आहे. अत्यंत कमी वेळामध्ये ही तपासणी होत असल्यामुळे जास्तीत जास्त संशयित कोरोनाबाधीत व्यक्ती शोधून लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातून घरी गेल्यावरही कोरोनाचा फुप्फूसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असल्यास या तपासणीच्या माध्यमातून त्याचे लवकरात लवकर निदान करणे शक्य होईल व त्यावर लवकर उपचार मिळू शकतील. आवाजातील बदलाच्या अनुषंगाने करोनाचे लवकरात लवकर निदान होणेबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत डॉ. भूमकर आणि सोनाली लोहार यांच्याशी गेले दोन महिने सातत्याने चर्चा सुरू असून त्यावर काम करणे सुरू होते त्यानुसार डॉ. भूमकर यांनी या पध्दतीचा अवलंब करुन ठाण्यामध्ये अभ्यासप्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवली असल्याचं महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading