ठाण्यात आता स्तर ३ चे निर्बंध लागू

शासनानं ब्रेक द चेन या अंतर्गत ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले असून संपूर्ण राज्यात निर्बंधाचा एकच स्तर म्हणजे तिसरा स्तर लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या डेल्टा या नवीन प्रकारामध्ये वाढ होत असल्यामुळं सर्व राज्यभर स्तर ३ चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ठाणे शहरामध्ये म्हणजे महापालिका क्षेत्रांतर्गत निर्बंधाचा स्तर हा २ होता. यामुळं सर्व व्यवहार बहुतांश खुले झाले होते. मात्र जिल्हाधिका-यांनी आज काढलेल्या आदेशामध्ये आता राज्यात सर्वत्र एकच स्तर म्हणजे तिस-या स्तराचे निर्बंध लागू असल्याचं म्हटलं आहे. हेच आदेश आता शहरातही लागू होणार आहेत. पूर्वी महापालिका ही प्रशासकीय घटक म्हणून वेगळी मानली जात होती मात्र आता सर्व राज्य हे एकच प्रशासकीय घटक मानून तिस-या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे आता ठाण्यात सर्व व्यवहार हे ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकानं ही ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यावर बंधनं आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मॉल आणि चित्रपटगृह हे बंद असतील. उपहारगृहं क्षमतेच्या ५० टक्के आणि तीही ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. मैदानं खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खाजगी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार ५० टक्के क्षमता वापरता येईल. असे ४ जून रोजी काढलेले स्तर ३ चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत. त्यामुळं आता ठाणे शहरातही जिल्ह्याप्रमाणेच निर्बंध लागू राहणार असून पूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रांतर्गत स्तर २ चे निर्बंध लागू होते मात्र आता ते स्तर ३ चे करण्यात आल्यानं काही व्यवहारांमध्ये निर्बंध आले आहेत. हे आदेश २८ जून पासून ५ जुलैपर्यंत लागू राहतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading