ठाण्यातील दुकानं आजपासून तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. ठाणे नौपाडा पोलीस आणि नौपाडा व्यापारी असोसिएशननं मिळून हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं आजपासून पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुकानं बंद ठेवण्यात आल्यामुळं गोखले रस्ता, बाजारपेठ, राम मारूती रस्ता अशा नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर आज शुकशुकाट दिसत होता. अगदी महत्वाच्या कामाला बाहेर पडलेले लोक वगळता रस्त्यावर सामसूम होतं. मुख्यमंत्र्यांनी आजच गर्दी टाळण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. ठाण्यातील दुकानं बंद करण्यात आल्यामुळं या आवाहनालाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसत आहे. ठाण्यातील महत्वाच्या रस्त्यांवर तुरळक वाहनं आणि व्यक्ती वगळता सामसूम दिसत आहे. असाच निर्णय मुंब्रा तसंच घोडबंदर येथील व्यापा-यांनीही घेतला आहे.