ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्रीपासून कडक निर्बंध

ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी असून रात्री ८ ते सकाळी ७ या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळात कोणत्याही व्यक्तीला वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास परवानगी नसेल. वैद्यकीय आणि इतर आवश्यक सेवाना सूट देण्यात आली असून त्यांच्यावर कोणतेही प्रतिबंध नसतील. रूग्णालय, क्लिनिक, फार्मासिस, आणि इतर वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई खाद्य पदार्थांची दुकाने सुरू राहतील. रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक बसेस, सर्व कृषी संबंधी सेवा, ई-कॉमर्स, अधिकृत मिडीया आणि ठाणे महापालिकेनं जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सर्व चौपाट्या, बागा, सार्वजनिक मैदानं बंद राहतील. तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स बंद राहतील. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. सहकारी बँक, खाजगी बँक, विद्युत पुरवठा कंपनी, दूरसंचार सेवा, विमा, कंपनी, फार्मास्युटिकल कंपनी वगळता सर्व खाजगी कार्यालयं बंद राहतील. सिनेमागृह, नाट्यगृह, सभागृह, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुल बंद राहतील. हॉटेल, बार, रेस्टॉरंटस् बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होम डिलीव्हरी सुरू राहील. सर्व धार्मिक स्थळं बंद राहतील. सर्व सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहतील. शाळा, महाविद्यालयं बंद राहतील. सर्व कोचिंग क्लासेस बंद राहतील. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. असं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading