ठाणे पोलीसांना 21 लाखांचा गुटखा पकडण्यात यश

ठाणे पोलीसांना 21 लाखांचा गुटखा पकडण्यात यश आले आहे. कोलशेत खाडीनजीक वापी येथुन आलेल्या ट्रकमधुन गुटख्याच्या गोण्या छोटया टेंपोमध्ये भरताना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी छापा मारून तिघाजणांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 21 लाखांच्या गुटख्यासह दोन वाहने आणि तीन मोबाईल असा सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन तिघाही आरोपींना न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. शासनाने तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आणि तत्सम पदार्थाचे सेवन, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली असताना गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरु आहे. कोलशेत गणेश विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ट्रकमधुन गुटख्याच्या गोण्या छोटया टेंपोमध्ये भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या संदीप बागुल यांना मिळाली होती. त्यानुसार छापा मारून दोन्ही वाहनांसह 15 हजारांचे 3 मोबाईल आणि 20 लाख 91 हजार 320 रुपये किमतीचा विमल गुटखा असा 33 लाख 06 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी ट्रकचालक धर्मराज तिवारी, टेंपोचालक शंकर गुप्ता आणि पिंटु विश्वकर्मा या तिघाना अटक करण्यात आली असुन कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वापी येथुन आणलेला हा गुटखा ठाणे, मुंबई आणि इतरत्र पुरवठा केला जाणार होता अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading