ठाणे परिवहन सेवेचा ४५८ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर

ठाणे परिवहन सेवेनं सन २०२१-२२ साठी ४५८ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे. ठाणे परिवहन सेवेला कोरोनामुळे ८० कोटी रूपयांच्या प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं आहे. परिवहन सेवेनं ३० हून अधिक बसेसचं रूपांतर रूग्णवाहिकेत केलं होतं. त्याचप्रमाणे कोरोना काळात १७५ जणांना कोरोनाची बाधा झाली त्यामध्ये १४ कर्मचा-यांचा मृत्यू झाला. या अंदाज पत्रकामध्ये डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत परिवहन सेवेच्या ताफ्यात ३०० बसेसची भर पडून परिवहनच्या ताफ्यात ७०० बसेस उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. परिवहन सेवेला बस भाड्यापोटी १२४ कोटी रूपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. तर इतर मिळकतीपासून १७३ कोटींची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बस दुरूस्तीसाठी १३ कोटी, सेवानिवृत्तीवर पावणे दोन कोटी खर्च होणार आहेत. तर ठाणे महापालिकेकडून २१ कोटी रूपयांचं अनुदान अपेक्षित करण्यात आलं आहे. परिवहन सेवेच्या उत्पन्न वाढीसाठी परिवहन सेवेच्या जागा, चौक्या तसंच एटीएमची उभारणी, परिवहन सेवेच्या आगारांमध्ये सौरउर्जेची उभारणी करून बचत करणे असे अनेकविध उपाय सुचवण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading