ठाणे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडसाठी पैसे घेणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटमध्ये आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेतल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर्स आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयु आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ठाणे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाच्या प्रवेशासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने ठाणे ग्लोबल रुग्णालयात दाखल करून देतो असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे घेवून रूग्णास दाखल केल्यानंतर समाज माध्यमातून चित्रफीत प्रसारित होताच, महापौरांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. अविनाश माळगावकर यांनी काल रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मे.ओमसाई आरोग्य केयर प्रायव्हेट लिमिटेड येथे कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत असणारे डॉ. परवेझ, नाजनीन, अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading