टेंभीनाक्याच्या नवरात्र उत्सवात शिंदे आणि ठाकरे समर्थक मिरवणूकीत एकत्र सहभागी.

टेंभीनाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शविल्याने हा सोहळा असंस्मरणीय ठरला. मिरवणुकीत शिंदे समर्थकांसह, विरोधी ठाकरे गटाचाही सहभाग होता. कळवा ते ठाणे दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणूकीमध्ये ढोल ताशा पथकांचे सादरीकरण, पारंपारिक लोकनृत्य, तुतारी, संबळ वादकांची पथके साग्रसंगीत सहभागी झाली होती. तब्बल पाच तास मिरवणुकीचा जल्लोष करीत सायंकाळी टेंभी नाक्यावर दुर्गेश्वरी विराजमान झाली. मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनीही दुर्गेश्वरीवर पुष्पवृष्टी करून सर्वधर्मसमभाव जपला. याप्रसंगी खा. श्रीकांत शिंदे तसेच अनेक मान्यवर नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते.
जय अंबे माँ सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंभीनाका येथे भव्य स्वरुपात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी १९७८ साली टेंभी नाका येथे नवरात्रौत्सवाला सुरूवात केल्यानंतर ठाणे आणि आसपासच्या शहरामध्ये या उत्सवाबद्दलचे आकर्षण वाढत गेले. शिवसेनेमध्ये पडलेल्या दोन गटांमुळे यंदाचा उत्सवातील दोन्ही गटांच्या सहभागाबद्दल प्रचंड कुतुहल निर्माण झाले होते. दोन्ही गटातील नेत्यांनी देवीच्या पाटाचे पूजन केल्यामुळे उत्सवामध्ये वादाची ठिणगी पडण्याची भीती व्यक्त होत होती. परंतु दोन्ही गटातील नेत्यांनी आगामन सोहळ्यात सहभाग नोंदवल्यामुळे मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उत्सवामध्ये सक्रीय सहभाग घेत आगमन मिरवणूकीमध्ये सहभाग नोंदवल्यामुळे यंदाच्या मिरवणूकीमध्ये गर्दीने उच्चांक गाठला होता. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राजकिय नेते, कार्यकर्ते, अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच अनेक हौशे, नवशे, गवशे या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी शिष्टाचार मोडुन या सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading