ज्युपिटर रूग्णालयातर्फे हृदय रोगावर सवलतीच्या दरात उपचार योजनेचा शुभारंभ

ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयानं हृदयरोगांवरील उपचारासाठी एक नवीन योजना उपलब्ध करून दिली असून आज दस-याच्या मुहुर्तावर या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ अश्विन मेहता यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सध्या हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे. हृदयरोग झाला की एखाद्याला धडकीच भरते कारण त्यावरील उपचाराचा खर्च हा लाखांच्या घरात जातो. यासाठीच ज्युपिटर रूग्णालयानं हृदय रोगांवरील उपचारासाठी परवडणारी योजना उपलब्ध करून दिली आहे. ज्युपिटर रूग्णालयाचे प्रमुख अजय ठक्कर यांनी या योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत हृदयरोगाच्या तपासणीसाठी रोज संध्याकाळी ६ ते ९ या वेळात १०० रूपये शुल्क आकारलं जाणार आहे. हृदयरोगाच्या निदानासाठी स्ट्रेस आणि इको टेस्ट प्रत्येकी ९०० रूपयात केली जाणार आहे. एन्जिओग्राफी ही ९ हजार ९०० रूपयात केली जाणार आहे. हृदयात स्टेंट बसवायचा असेल तर युएसएफडीए मान्यता प्राप्त स्टेंट हा सव्वा लाख रूपयात बसवून दिला जाणार आहे. तर हृदय रोगांवरील शस्त्रक्रियेसाठी १ लाख ३० हजार रूपये आकारले जाणार आहेत. या खर्चामध्ये रूग्णालय, नर्सिंग, डॉक्टर शुल्क, निवास, भोजन अशा सर्वांचा समावेश असल्याचंही डॉ. ठक्कर यांनी सांगितलं. सध्या हृदय रोगावर केल्या जाणा-या उपचारासाठी आकारल्या जाणा-या खर्चापेक्षा हा दर ६० ते ७० टक्के कमी असल्याचा दावा डॉ. अजय ठक्कर यांनी केला. या खर्चामध्ये सर्व खर्चाचा अंतर्भाव असून या व्यतिरिक्त एक रूपयाही शुल्क अतिरिक्त आकारलं जाणार नसून ज्युपिटर मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ परवडणा-या दरात उपलब्ध होणार असल्याचं डॉ. अजय ठक्कर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading