जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने १६ जानेवारी रोजी ‘वित्त लेखा कर आणि अंकेक्षणातील नवे विचार प्रवाह’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालय गेल्या पन्नास वर्षांपासून उच्च शिक्षणामध्ये नवनवीन किर्तीमान स्थापित करत आहे. महाविद्यालयाने नुकतेच सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले असून स्वायत्तता प्राप्त झालले जिह्यातील हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. नवनवीन शैक्षणिक प्रयोग करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याऱ्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवित आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला विद्यार्थी सक्षम व्हावा यासाठी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर सतत प्रयत्नशील असतात. संशोधन हाच नव्या शिक्षणाचा पाया असायला हवा, प्राध्यापकांनी सतत संशोधनाचा ध्यास अंगी बाळगावा यासाठी महाविद्यालयातर्फे विविध परिषदांचे आयोजन केले जाते. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावानंतर “वित्त, कर आकारणी, लेखापरीक्षण आणि अंकेक्षण” या अर्थविषयक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अनेक नवीन घडामोडी घडत आहेत. याचा अभ्यास व्हावा आणि या क्षेत्रातील तज्ञ अभ्यासकांच्या उपस्थितीत सांगोपांग विचारमंथन व्हावे या हेतूने महाविद्यालयाच्या लेखा विभागातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कामात इंडियन अकाउंटिंग असोसिएशन आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ठाणे शाखेचे सहकार्य लाभले आहे. वित्त, लेखा आणि कर आकारणीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ब्लॉक चेन, सायबर सिक्युरिटी इत्यादी नवीन तंत्रज्ञानाचा सध्या उपयोग होत आहे. नवीन उद्योगधंद्यांच्या स्थापनेपासून कार्य विस्तारामध्ये वित्त लेखा आणि कर आकारणी क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर ऑटोमेशन आणि समाज माध्यमांचा वाढता वापर इत्यादी नवीन तंत्रज्ञानाचा जोमाने वापर होत आहे. कोरोनोत्तर काळामध्ये होणाऱ्या या नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, नागरिक या सर्वांनी एकत्र येऊन विचार मंथन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचं लेखा विभागाचे प्रमुख प्रा. योगेश प्रसादे यांनी सांगितले. या परिषदेत अर्थ विषयक चर्चा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसाधारण नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी काय करता येईल याचे चिंतन होईल असा विश्वास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केला. या परिषदेचे आयोजन आभासी माध्यमातून करण्यात येणार असुन परिषदेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात येईल. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी तज्ञ संशोधक व अभ्यासकांनी आपले शोधनिबंध 10 जानेवारी पर्यन्त jbcacconference.2021@gmail.com किंवा jbcbrodcaslist@gmail या मेलआयडीवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी 99 30 31 65 49 आणि 8308677957 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading