जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम मिशन मोडवर राबविण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय यंत्रणांनी दोन पाऊले पुढे येण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या जीवनात दर्जात्मक आणि गुणात्मक सुधारणा घडविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात हा उपक्रम मिशन मोडवर राबविण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय यंत्रणांनी दोन पाऊले पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील योजनांच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरीत मिळावा तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातही या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवून त्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासंदर्भात आज पूर्व तयारी बैठक पार पडली. प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील योजनांच्या लाभार्थींची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, त्यांची पात्रता तपासणे व त्यांना लाभ देण्यासंदर्भातील इतर कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. निवडलेल्या लाभार्थ्यांना जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे लाभाचे वितरण करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. राज्य शासनाचे विविध विभाग हे स्थानिक पातळीवर त्यांच्या योजनांचे लाभ नागरिकांना देत असतात. मात्र त्याचा एकत्रित परिणाम जाणवत नाही. त्यामुळे शासन आपल्या दारी उपक्रमातून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ दिल्यास जनतेपर्यंत त्यांची माहिती पोहचेल आणि नागरिकांनाही वेगवेगळ्या योजनांची माहिती होईल. त्यामुळे स्थानिक यंत्रणांनी लोकांपर्यंत योजना पोहचवून लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पाडावी आणि यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. जेणेकरून जिल्हास्तरावर एकत्रित कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना लाभ देता येईल. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार स्तरावर जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून आढावा घेण्यात येईल.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading