जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या हस्ते शुभारंभ

वसुंधरा संजीवनी मंडळ आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीसाठी प्रचार रथाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांनी झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत पहिल्या टप्यात ठाणे जिल्हयातील कल्याण,अंबरनाथ,मुरबाड,शहापूर भिवंडी या तालुक्यातील 72 तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल, तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावामध्ये / तालुक्यामध्ये पाणी साठविण्यासाठी विहिरी, गाव तलाव, पाझर तलाव तसेच लहान-मोठे तलाव आणि धरणे आहेत. बऱ्याच ठिकाणी तलावांमध्ये गाळ साचतच असतो त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. जर आपल्या गावाला जल आत्मनिर्भर करावयाचे असेल, तर या सर्व जलसाठ्यांमधून गाळ काढणे त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन करणे नितांत आवश्यक आहे.
‘जलयुक्त शिवार तसेच ‘जल जीवन मिशन या योजनांच्या माध्यमातून वरील सर्व कामे सहजरीतीने करता येऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतींना आणि पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सक्षम केल्यास, आपल्या परिसरातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो. ज्या ग्रामपंचायती आपले गाव ‘जल-आत्मनिर्भर’ करण्यासाठीची ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील, अशा ग्रामपंचायतीकडून मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading