जलद प्रवासासाठी रिंगरोडची आवश्यकता लक्षात घेऊन एम.एम.आर.डी.ए.ने डीपीआर बनवावेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एम.एम.आर.डी.ए. ला डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ऑनलाईन भूमीपूजन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला झाला. यावेळी कै.दिलीप कपोते बहुमजली वाहनतळ, पात्र प्रकल्पबाधितांना सदनिका वितरण, अग्निशमन केंद्र मुख्यालय आधारवाडी आणि प्रभाग क्षेत्र कार्यालय, अमृत २.० अंतर्गत गौरीपाडा येथे ९५ द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील नवीन जलकुंभ बांधणे, या कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न झाले. त्याचबरोबर सिटी पार्क आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्प अंतर्गत प्राप्त ई-बसेसचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रत्यक्षात लोकार्पण करण्यात आले.
कल्याण शहराला मोठा इतिहास आहे. कल्याण पश्चिम मध्ये उल्हासनगर सारखे हॉस्पिटल उभे करावे. सिटी पार्क उभे राहिले आहे. यामुळे नागरिकांना विरंगुळयासाठी एक उत्तम साधन मिळाले आहे. शहरासाठी आवश्यक चांगल्या पर्यावरणाकरिता नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत. मुंबईप्रमाणेच कल्याण-डोंबिवली मध्येही डीप क्लिनिंग अभियान सुरू करावे, यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होईल.
कल्याण- डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी आवश्यक लागेल तेवढा निधी पुरविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हे मनोगत व्यक्त करताना म्हणले की, स्मार्ट शहराची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि त्यात कल्याण- डोंबिवली महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे याचा विशेष अभिमान आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading