जनजागृतीपर कार्यक्रमांनी जागतिक एड्स दिन साजरा

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्षाच्या वतीने प्रभातफेरी, जनजागृतीपर पथनाट्य, रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अतिजोखमीचे गट/भाग/जागा/ठिकाणावर, स्थलांतरित कामगारांच्या रहिवास तसेच कामाच्या ठिकाणी, मुख्य चौक, बाजार पेठ, गर्दीचे ठिकाणी व्यापक जनजागृती करून जिल्हा आणि तालुका स्तरावर अधिक प्रभावी मोहिम राबविण्याचे तसंच एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तीसोबत भेदभाव आणि कलंक मिटवून समानता आणण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी केले. एचआयव्हीसह जगणा-या व्यक्तींना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी यावर्षी “आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता या विषयावर १ ते ३१ डिसेंबर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आज जागतिक एड्स दिनापासून याची सुरूवात झाली. यावेळी डॉ. कैलास पवार आणि इतर मान्यवरांनी प्रभातफेरीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही जनजागृतीपर प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथून कलेक्टर ऑफिस मार्गे -जांभळी नाका टेंभी नाका मार्गे सामान्य रुग्णालय, ठाणे येथे विसर्जित करण्यात आली. या प्रभात फेरीत बा. ना बांदोडकर कॉलेज, एन.के.टी कॉलेज ठाणे, ज्ञानसाधना कॉलेज, आर.जे. ठाकूर कॉलेज, सामान्य रुग्णालयातील परिचारीका प्रशिक्षण केंद्र, मुंब्रामधील कळसेकर कॉलेज, कासारवडवली ज्ञानगंगा कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांसह विविध सामजिक संस्था, एचआयव्ही एड्स क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. कैलास पवार यांनी उपस्थितांना एच. आय. व्ही. एड्स होण्यामागील कारणांची माहिती दिली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्ही निर्मुलन करण्यासाठी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील मोफत औषधोपचार आणि चाचणी करणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी ठाणे येथील आदिती असर ग्रुपमार्फत एच.आय.व्ही / एड्स विषयी “जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या आयसीटीसी, एआरटी, सुरक्षा केंद्र, क्षयरोग विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी नागरी आरोग्य केंद्र, हस्तक्षेप प्रकल्प गट, रक्तपेटी यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पोस्टर पेंटींग आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना तसेच जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी विविध मार्गाने सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांना एच.आय.व्ही एड्स विषयी जनजागृतीपर शपथ देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading