ग्रंथाली प्रतिभांगणच्या माध्यमातून सरस्वती सेकंडरी स्कूल येथे विज्ञानधारा कार्यक्रमाचं आयोजन

“ग्रंथाली प्रतिभांगण”च्या माध्यमातून युट्युबच्या “ग्रंथाली प्रतिभांगण” वाहिनीवर विज्ञानधारा नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दर महिन्यातून दोनदा प्रसारित होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करून त्यांना संशोधनासाठी उद्युक्त करणे, शिक्षकांना त्यांच्या कार्यात मदत करणे आणि सर्वसामान्य जनतेत विज्ञानमूल्ये रुजविणे असा तिहेरी हेतू या वाहिनीचा आहे. शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी यांच्या संवादातून हे हेतू साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकविसाव्या शतकात विज्ञान प्रचंड झेप घेत असतांना, देशातील आणि विशेषतः राज्यातील सर्वसामान्यांना, केवळ भाषेच्या माध्यमामुळे, मागे राहण्याची वेळ आली असे म्हणावे लागू नये हाही एक उद्देश या कार्यक्रमाचा आहे. या प्रत्येक कार्यक्रमात जो विद्यार्थी विचारप्रवर्तक प्रश्न विचारेल किंवा कुतूहल व्यक्त करेल, त्यास ‘कुतूहलरत्न’ असे विशेष प्रमाणपत्र आणि एक पुस्तक बक्षिसाच्या स्वरूपात दिले जाते. भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास कार्यक्रमात सामील झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
या मालिकेतील पहिला कार्यक्रम ग्रंथालीच्या वांद्रे येथील प्रतिभांगण येथे झाला. दुसरा कार्यक्रम ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल येथे ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांच्या ‘चिंतन (भाग ३)’ आणि ‘भगवद्गीतेतील विज्ञानमूल्ये’ या पुस्तकांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच डॉ. शरद काळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक शंकांचे समाधान प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading