छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती आज साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनावरुन वाद आहे. त्यामुळे शिवप्रेमी तिथीनं शिवजयंती साजरी करतात. तर शासनाच्या नोंदीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी रोजी झाला असल्यामुळे शासकीय पातळीवर 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी होत असल्यामुळे आत्तापर्यंत यात शिवसेना तसेच शिवप्रेमी मंडळींचा सहभाग दिसत नसे. पण यंदा शिवसेनेचीच सत्ता असल्यानं सर्वत्र शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याचं दिसत आहे. आज रस्त्यारस्त्यात जाणता राजाचे झेंडे घेऊन वाहनं फिरताना दिसत आहेत. यामध्ये युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. दिवसभर छत्रपती शिवाजी महारांजाचं छायाचित्र असलेले भगवे झेंडे लावून रिक्षाचालक आणि दुचाकीधारक महाराजांचा गजर करताना दिसत होते. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं. शिवाजी मैदानात ३० बाय ४० फूट अशी पणत्यांच्या आधारे भव्य अशी रांगोळी रेखाटण्यात आली आहे. चेतन राऊत आणि त्यांच्या १० सहका-यांनी ही रांगोळी रेखाटली असून सध्या ती आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading