ग्लोबल कोविड रूग्णालयात दीड लाख रूपये घेऊन बाहेरच्या रूग्णाला दाखल करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रूग्णालयात ठाण्याबाहेरच्या रूग्णास दीड लाख रूपये घेऊन प्रवेश दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढला असून अशा परिस्थितीत रूग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती असून त्यामुळं रूग्णही हैराण झाले आहेत. ठाणे महापालिकेनं करोडो रूपये खर्च करून कोविड रूग्णालयं उभी केली असून या रूग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार केले जातात. मात्र असं असतानाही पैसे घेऊन रूग्णालयात प्रवेश दिल्यामुळे रूग्णालय प्रशासनही अडचणीत आलं आहे. काल रात्री बारा- साडेबाराच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनाही बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याच वेळी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास वसईतील एका रूग्णास दीड लाख रूपये घेऊन दाखल करण्यात आलं. वसईतील हा रूग्ण अतिशय गंभीर परिस्थितीत होता. त्याला सेव्हन हिल रूग्णालयातून या रूग्णालात दाखल करून घेण्यात आलं. पहिले पैसे दिल्यानंतरच रूग्णाला दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. या पैशामध्ये सर्वांचा हिस्सा असून पैसे मंत्र्यां-संत्र्यांपर्यंत जातात असं त्यांना सांगण्यात आलं. हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला असून या सर्व रेकॉर्डींगची एक प्रतही जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठवली आहे. एकूणच या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading