गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना

ठाणे महापालिकेनं घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या असून घरगुती गणपती मुर्तीची उंची 2 फुटापर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 4 फुट उंच मुर्तीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने श्रीगणेश मुर्ती दान स्वीकृती केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स ॲाक्सीमीटरच्या साहाय्याने तपासणी बंधनकारक राहणार असून मंडपातील प्रत्येकाची नोंद ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ठाण्याचे महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.
घरगुती गणपतीसाठी श्रीगणेश मुर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे, आगमनाच्या आणि विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त तीन लोक असावेत, गणपतीची सजावट पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी असावी, प्लास्टीक आणि थर्माकोलचा वापर करू नये, गणपतीच्या दर्शनासाठी, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात, विसर्जनस्थळी नागरिकांना कमीत कमी वेळ थांबता यावे यासाठी घरीच श्रीगणेशाची आरती करून विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करण्यात यावे अशा महत्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मोठ्या गृहसंकुलाच्या ठिकाणी त्यांच्या संकुलातील गणेश मुर्तीचे विसर्जन सिंटेक्सच्या मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याबरोबरच निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात यावे असे स्पष्ट करून ठाणे महानगरपालिकेने नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेशमुर्ती पुजावी आणि घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जन करावे अथवा पीओपी गणपती मुर्ती बाबत विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करावा.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करणे टाळावे. मात्र तरीही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला तर तो कमीत कमी दिवस साजरा करावा, गणपतीची मुर्ती 4 फुटाच्या मर्यादेत असावी, मंडळांनी मंडपामध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य असून मंडपामध्ये थर्मल स्कॅनर, पल्स ॲाक्सीमीटरच्या माध्यमातून भाविकांची तपासणी करावी, त्यांची नोंद ठेवावी, मंडपामध्ये एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच मंडपामध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश दर्शनासाठी शक्यतो केबल नेटवर्क, ॲानलाईन सुविधा अथवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी असे स्पष्ट करून मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद आदी कार्यक्रमाना गर्दी टाळण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गर्दी आकर्षित होईल अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित न करता आरोग्यविषयक तसेच सामाजिक संदेश असणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची उंचीही 12 फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्याची जबाबदारी मंडळांची राहिल. त्याचबरोबर मंडपामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद करणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहणार आहे.
हॅाटस्पॅाट आणि प्रतिबंधित क्षेत्रांमधील गणपती मुर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्याबाहेर विसर्जनास परवानगी देण्यात येणार नसून कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवामध्ये कोरोनाची संसर्ग होणार नाही यासाठी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे.
महापालिकेच्या वतीने गणेश दान मुर्ती स्वीकृती केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी महापालिका क्षेत्रात तीन ठिकाणी स्वीकृती केंद्रे निर्माण करण्यात आली होती. यावर्षी एकूण 20 ठिकाणी मुर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. तर
महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 13 ठिकाणी कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहेत. तर 7 ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्यात येणार आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading