कोरोना रूग्ण कमी झाल्यामुळे कर्मचा-यांवर गदा आल्यानं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कर्मचा-यांचं आंदोलन

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष उभा राहिला आहे. महापालिका आणि कंत्राटदार कंपनी यांच्यातील करार संपुष्टात येईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याबरोबरच वेतन कपातही करू नये, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज संपावरील कर्मचाऱ्यांची भेट घेण्याबरोबरच ग्लोबल व्यवस्थापनाशी चर्चा केली. तसेच दोन दिवसांत कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर न घेतल्यास शनिवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. कोविडच्या दोन लाटांमध्ये जीवाची पर्वा न करता महापालिकेच्या ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले कोरोना योद्धा डॉक्टर, नर्स, पेशंट केअर, एक्स रे टेक्निशियन आदी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अन्यायकारक पद्धतीने कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. या पार्श्वभूमीवर आजपासून कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला. ओम साई आरोग्य केअरबरोबर महापालिकेचे कंत्राट असेपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार कमी करू नये. तसेच कोणालाही कामावरून काढू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात महापालिकेने दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांसह ग्लोबल कोविड हॉस्पिटलसमोर उपोषण करणार आहेत. महापालिका आणि ओस साई आरोग्य केअर यांच्यातील करारानुसार रुग्णसंख्या कमी असली, तरी हॉस्पिटलच्या बेडक्षमतेच्या २५ टक्के बेडची रक्कम दिली जाते. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाते. अनेक कर्मचाऱ्यांना दोन वेळा कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, त्यानंतरही ते कार्यरत आहेत. मात्र, आता त्यांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. तर पगारही कमी केला जात आहे. हा त्यांच्यावरील अन्याय आहे. काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करावे. तसेच पगारही कमी करू नये. अन्यथा, ग्लोबल हॉस्पिटलसमोर शनिवारपासून बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही प्रविण दरेकर यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading