जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग देण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे आणि अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. लसींचा काटेकोरपणे वापर करतानाच अंथरूणाला खिळलेले रुग्ण, गर्भवती बेघर, भिकारी आणि मनोविकार रुग्ण यांचे लसीकरणाचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी यावेळी आरोग्य यंत्रणेला निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात सुमारे 59 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी मनिष रेंघे यांनी सांगितले. ज्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट वर्कर्सनी दुसरा डोस घेतलेला नाही त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, अंथरूणाला खिळलेले रुग्ण, गर्भवती, बेघर, भिकारी आणि मनोविकार रुग्ण यांचे लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश यावेळी यंत्रणेला देण्यात आले.