शेगांवच्या गजानन महाराजांचा १४३वा प्रगटदिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. मात्र या उत्सवावर कोरोनाचं सावट दिसून येत होतं. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा विविध भागात प्रगट दिन साजरा झाला मात्र नेहमीप्रमाणे कुठेही गर्दी दिसली नाही. ठाण्यातील राम मारूती रस्त्यावरील गजानन महाराज मंदिर, शिवाई नगर येथील गजानन महाराज मंदिर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा विविध ठिकाणच्या गजानन महाराज मंदिरात भाविकांची नेहमीप्रमाणे गर्दी दिसली नाही. पूर्वी प्रगट दिनाच्या वेळी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत असे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीचं नियोजनही करावं लागे. रस्तेही बंद केले जात पण यंदा मात्र
गजानन महाराजांच्या मंदिरासमोर फारशी गर्दी दिसत नव्हती. मंदिरातील स्वयंसेवक दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गर्दी करू नये असं सतत आवाहन करत होते तर ज्यांनी मास्क घातले नव्हते त्यांना मास्क घालण्याचंही आवाहन केलं जात होतं. प्रगट दिनाच्या निमित्तानं गजानन महाराजांना आवडणा-या खिचडी, भाकरी, पिठलं, अंबाडीची भाजी, दाण्याची चटणी अशा प्रसादाचं वाटप ठिकठिकाणी केलं जातं, मात्र यंदा या सर्वाला फाटा देण्यात आल्याचं दिसत होतं. भक्तांना प्रसाद म्हणून खडीसाखर दिली जात होती.