कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासनाने सज्ज रहावे – पालकमंत्री

कोविडची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सज्ज रहावे अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत दिल्या. त्याचबरोबर ठाणे ग्लोबल कोविड हॅास्पीटल आणि पार्किंग प्लाझा रूग्णालय येथे तातडीने सीटीस्कॅन सुविधा सुरू करण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. कोविडच्या इतर रूग्णांबरोबरच कोविडची लागण झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था तसेच सहव्याधी रूग्णांची काळजी घेण्याच्या सूचना देतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा नियमित आढावा घेवून अशा रुग्णांच्या हातावर शिक्का मारुन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि जास्तीत जास्त संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होतील या दृष्टीने महापालिकेने कटाक्षाने कार्यवाही करावी अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या. गेल्यावर्षी पेक्षा यावेळेस कोरोना संक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत असून रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करीत सर्व प्रशासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी देखील सक्षमपणे काम करण्याचे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. याकामी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर सर्व ताकदीनिशी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. या सेंटर आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधसाठा, रेमडेसिवीर आणि आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचित केले. याचबरोबर लसीकरण केंद्रे वाढवून जास्तीत जास्त लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी मनुष्यबळाची संख्या वाढवावी. तसेच होम कोरंटाईन केलेल्या रुग्णांवर शिक्के मारुन तो रुग्ण घराबाहेर पडणार नाही याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करण्यात यावी यासाठी तज्ज्ञ डॉक्टर सज्ज करण्यात यावेत. यापूर्वी कार्यान्वित केलेली विलगीकरण कक्ष सज्ज करुन या ठिकाणी दैनंदिन साफसफाई, आवश्यक औषधपुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर्स, भोजनाची व्यवस्था होईल या दृष्टीने प्रशासनाने काम करावे. तसेच ज्या विभागात रुगण सापडत आहेत, तेथील नागरिकांमध्ये जनजागृती होणेसाठी होर्डिंग्ज लावणे, कोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी शहरातील होर्डिंग्जवर कोविड वॉर रुमचे दूरध्वनी क्रमांक देवून संपर्क साधण्याचे आवाहन करावे. ठाणे महापालिकेचा कोविड वॉर रुम हा अद्ययावत असून रुग्णांना संपर्क साधल्यास तात्काळ सेवा पुरविली जाते, परंतु रुग्णांनी या वॉर रुमपर्यत पोहचणे आवश्यक असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले. अत्यंत चांगल्या प्रकारे ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहिम चालू असून लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, प्रभागनिहाय सर्वच लोकप्रतिनिधी चांगल्याप्रकारे काम करीत असून यापुढे देखील समन्वयाने करावे तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना त्वरीत उपलब्ध होईल या दृष्टीने देखील स्वतंत्र डेस्क तयार करण्याबाबतही महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला सूचित केले. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सर्व विभागांमध्ये दैनंदिन साफसफाई योग्यप्रकारे करणे, आवश्यकतेनुसार औषधफवारणी करणे तसेच जे नागरिक मास्क वापरत नाही त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे, वेळप्रसंगी पोलीसांची मदत घेणे तसेच रात्री 8 नंतर लागू संचारबंदीचे पालन होत आहे की नाही यासाठी गस्त वाढविणे, आवश्यकतेनुसार मार्शलची नियुक्ती करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी दाखल करता यावे रुग्ण्वाहिकांची संख्या वाढविणे, आवश्यकतेनुसार परिवहनच्या बसेसचे रुग्णवाहिकेत परिवर्तीत करणे, तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची सीटीस्कॅन करण्यासाठी ग्लोबल कोविड सेंटर, पार्किंग प्लाझा येथे सीटीस्कॅनची मशीन उपलब्ध करणे, जेणेकरुन रुग्णांना इतरत्र जावे लागणार नाही आणि रुग्णांवर योग्य उपचार करणे सोईचे होईल या दृष्टीने कार्यवाही करावी आदी सूचना देत असतानाच या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading