कोरोनाच्या छायेखाली नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान मंगलमय वातावरणात – मात्र फटाक्यांची आतिषबाजी नाही

नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस कोरोनाच्या छायेखालीच साजरा झाला. आज पहाटे अभ्यंगस्नान मंगलमय वातावरणात झालं. मात्र फटाक्यांची आतिषबाजी जवळपास झालीच नाही. नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान पहाटे धुमधडाक्यात करण्यात आलं पण कोरोना असल्यामुळं मोठ्या आवाजाचे फटाके उडवण्यावर बंधन होतं. त्यामुळं नेहमीच्या तुलनेत यंदा फटाके फारसे वाजल्याचं दिसलं नाही. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाच्या रूग्णांना त्रास होऊ शकतो म्हणून शासनानं दिवाळी साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार बहुतांश ठिकाणी शासनाच्या निर्बंधांचं पालन करण्यात आलं. अगदी तुरळक ठिकाणीच तेही अगदी ५ ते १० मिनिटं फटाके उडवण्यात आले. अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी कृष्णानं नरकासूराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातील १६ हजार तरूणींची मुक्तता केली. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला. त्यावेळी त्याला अभ्यंगस्नान घालण्यात आलं. या घटनेची स्मृती म्हणून अभ्यंगस्नान केलं जातं. नरकासुराचं प्रतिक म्हणून कारिंटे पायाच्या अंगठ्यानं चिरडून अभ्यंगस्नान करतात. दरवर्षी अभ्यंगस्नान झाल्यावर कौपिनेश्वर मंदिर, सिध्दीविनायक मंदिर, घंटाळी देवी मंदिर, विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर अशा विविध मंदिरात भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडते. यंदा मात्र मंदिरं बंद असल्यामुळं भाविकांनी दर्शनासाठी कुठेही गर्दी केल्याचं दिसलं नाही. मात्र काही ठिकाणी बंद मंदिरातील देवांचं दर्शन भाविक बाहेरून घेत होते. राम मारूती रस्त्यावरील गजानन महाराजांचं मंदिर, जांभळीनाक्यावरील सिध्दीविनायक मंदिरात असं चित्र दिसत होतं. तर कौपिनेश्वर मंदिरही अर्ध खुलं करून ठेवण्यात आलं होतं. भाविक बाहेरूनच दर्शन घेताना दिसत होते. राम मारूती रस्ता, तलावपाळी परिसरात दिवाळी म्हटलं की तरूणाईचा सागर उसळल्याचं चित्र दिसतं. पण यंदा मात्र सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. अगदी तुरळक ठिकाणी युवक-युवती नटून थटून उभे असल्याचं चित्र पहायला मिळालं. विविध संस्थांतर्फे दिवाळीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं मात्र यंदा यावरही निर्बंध असल्यामुळं असे कार्यक्रम कुठेच दिसले नाहीत. तर यंदा याऐवजी खासदार राजन विचारे यांच्यातर्फे रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं यंदा प्रथमच दिवाळी असतानाही कुठेही वाहतूक कोंडी दिसली नाही. पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त असला तरी पोलीसांना वाहतूक कोंडी नसल्यामुळं फारसं काम नव्हतं. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे गेल्या अनेक वर्षांची देवदर्शनाची परंपरा यामुळं खंडीत झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading