कोरोनाग्रस्त पालक रूग्णालयात असल्याने लहानग्याचा वाढदिवस पोलिसांनी केला साजरा

पोलिसांची तशी सामान्य माणसाला नेहमीच भीती वाटते परंतु पोलीस देखील माणूसच असून ठाण्यात पोलिसातील माणुसकीचे दर्शन झाल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले. याला कारण ठरला एक 7 वर्षीय लहानगा. त्याचे आई-वडील कोरोनामुळे रुग्णालयात असल्याने डायघर पोलिसांनी घरी जाऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. द्रिश गुप्ता हा सात वर्षीय मुलगा आपले वडील दिनेश आणि आई सोबत निर्मल नगरी, खर्डीपाडा येथे राहतो. काहीच दिवसांपूर्वी दिनेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी या कोरोनाबाधित असून वाशी येथील एमजीएम इस्पितळात ते उपचारासाठी दाखल आहेत. द्रिश आपली आजी आणि इतर लहान भावंडांसह घरी राहिला. आज द्रिशचा वाढदिवस असल्याने तो आपण साजरा करू शकत नाही याचे अतीव दुःख गुप्ता दाम्पत्याला झाले. आपल्या मुलाचा वाढदिवस कोणत्याही परिस्थितीत करायचाच या इराद्याने त्यांनी काल रात्री जवळपास 11.15 वाजता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवर ट्वीट करून द्रिश याचा वाढदिवस साजरा करावा अशी विनंती केली. वरिष्ठांचे आदेश मिळताच शीळ डायघर पोलिस ठाण्याचे वरीष्ट पोलिस निरिक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक ब्रिजेश शिंदे, विशाल चिटणीस, कृपाली बोरसे, पोलिस उपनिरिक्षक सुजाता पाटील, पोलिस नाईक प्रदीप कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनीही मंगळवारी खर्डीपाडा येथील गुप्ता यांचे घर गाठीत द्रीशचा वाढदिवस साजरा करून त्यास शुभेच्छा दिल्या.दिनेश यांची मुले खूप लहान असून ते दोघेही कोरोना बाधित झाल्याने या मुलांचा सांभाळ सध्या त्यांची आजी करीत आहे. परंतू वाढदिवसाला नेमके आईवडील त्यांच्याजवळ नाहीत, अशा वेळी पोलिसांनी येऊन त्यांचे पालकत्व निभावल्याने खूप चांगले वाटल्याची भावना सोसायटीतील नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading