कोणताही आपत्तीत मदत कार्यासाठी तात्काळ सज्ज राहावं – शंभूराज देसाई

जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. जनतेला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.


पालकमंत्री श्री. देसाई हे सातत्याने जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रायगडमधील इर्शाळगड दुर्घटना आणि राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यग्र असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीचा जिल्हा प्रशासन, महापालिका/ नगरपालिका आयुक्त, पोलीस विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन याप्रसंगी आढावा घेतला. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीची माहिती त्यांनी यावेळी घेतली. संभाव्य आपत्ती रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आणि पूर्ण वेळ सतर्क राहण्याचे निर्देश यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसिलदार संजय भोसले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ हे जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाले होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे आयुक्त तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व संबंधित इतर विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाऊस, नद्यांची पातळी, पाणी भरण्याची ठिकाणांची स्थिती, तसेच धोकादायक इमारतीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. धोकादायक इमारतींमध्ये राहणारे, तसेच दरडप्रवण आणि डोंगरी भागातील, लो लाइन एरियातील नागरिकांशी प्रशासनाने सतत संपर्कात राहावे. आवश्यकता भासल्यास तेथील नागरिकांना संक्रमण शिबिरात अथवा सुरक्षित स्थळी हलवावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
जिल्हा प्रशासनातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपत्ती काळात फिल्डवर तातडीने उपस्थित राहावे. महापालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी हे सुद्धा त्यांच्या कर्तव्यस्थळावर उपस्थित असतील, याची खात्री संबंधित महापालिका आयुक्तांनी करावी. तसेच पोलिसांनी अतिवृष्टीच्या काळात रात्रीची गस्त वाढवावी. एखाद्या ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास, काही मदत लागल्यास त्या ठिकाणी तातडीने पोहोचावे. कोणत्याही क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
संभाव्य आपत्तीशी सामना करण्यासाठी तसेच नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला कोणत्याही मदतीची गरज लागल्यास पालकमंत्री म्हणून तातडीने ती मदत राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले. काहीही अडचण असल्यास अथवा आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांपर्यंत हवामानविषयक सूचना पोहोचवाव्यात, तसेच आवश्यक असेल तिथे एनडीआरएफ किंवा एसडीआरएफची पथके तैनात करावीत, अशाही सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील एकूण आपत्ती व्यवस्थापन संबंधित परिस्थितीची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री महोदयांनीही ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
०००००

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading