कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीची तयारी सुरू

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील जास्तीत पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा तसेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या वाढावी, यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. पात्र पदवीधरांना कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारयादीत यापूर्वी नाव नोंदणी केली असली तरी परत नव्याने नाव नोंदणी करावी लागणार आहे. यासाठीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, असे शिनगारे यांनी यावेळी सांगितले. पदवीधर मतदारसंघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत, अशा सर्व पात्र पदवीधरांना नवीन यादी तयार करताना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती 1 नोव्हेंबर 2023 पूर्वी किमान 3 वर्षे भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदार नोंदणीत 46 हजार पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणी केली होती. या वेळेस यामध्ये आणखी वाढ व्हावी, जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत. शासकीय संस्थांमधील पदवीधरांच्या नोंदणीसाठी त्या संस्थांनी दिलेले पत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच महिला पदवीधरांच्या नावासाठी पॅन कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 18 ठिकाणी पदनिर्देशित अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading