कामगार हॉस्प‍िटल ते इंदिरानगर पर्यंतच्या रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करुन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या महापौरांच्या सूचना

कामगार हॉस्प‍िटल ते इंदिरानगर पर्यंतच्या रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांचे योग्यप्रकारे लवकरात लवकर पुनर्वसन करुन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना काल झालेल्या बैठकीत महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या. यामुळे या रस्त्याच्या कामास गती मिळणार असून नागरिकांची वाहतूकीकोंडीपासून मुक्तता होणार आहे. तसेच इंदिरानगर पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या पाईपलाईनचे देखील काम मार्गी लागणार असल्याने या विभागातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार असल्‌याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. महापालिका रस्ता मोहिमेअंतर्गत वागळे इस्टेट विभागातील संत ज्ञानेश्वर नगर नाका ते इंदिरानगर नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी ज्ञानेश्वरनगर नाका ते कामगार हॉस्प‍िटल नाक्यापर्यतचे काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून महापौर दालनात स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. ज्ञानेश्वर नगर नाका ते इंदिरानगर नाक्यापर्यतच्या रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये काही नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत पालकमंत्र्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन बाधित होणाऱ्या व्यावसायिक गाळ्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे आणि निवासी नागरिकांना महापालिकेच्या सदनिका उपलब्ध करुन देण्याबाबत आदेश दिले आहे. त्यानुसार या बैठकीत चर्चा करुन हा रस्ता 30.5 मीटर रुंद करुन बाधित नागरिकांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करुन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आहे. येथील जलवाहिनी टाकण्याचे काम देखील पूर्ण करावे जेणेकरुन वागळे इस्टेट विभागातील पाणी समस्या लवकरात लवकर दूर होईल असेही महापौरांनी नमूद केले. महापालिकेच्या विकासकामाबाबत नागरिकांनी नेहमीच सहकार्य केलेले आहे. या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading