कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महाहब’ उभारणीकरिता ५०० कोटी रुपयांची मंजुरी

महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपयांची तत्वत: मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा मोठा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून कल्याण येथे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. रस्ते काँक्रिटीकरण्याची कामे, ऐतिहासिक मंदिर परिसर सुशोभीकरण, भुयारी गटार, जल जीवन मिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आगरी कोळी वारकरी भवन यांसारखे अनेक प्रकल्प मतदारसंघात मार्गी लागत आहेत. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे रूप पालटत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे तसेच कल्याण या परिसरात मजबूत उदयोजकीय इको सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. भविष्यात महाराष्ट्रातील स्टार्टअपची संख्या वाढावी, तसेच उद्योजकांना एका छताखाली स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी पोषक वातावरण मिळावे ही ‘महाहब’ची मुख्य संकल्पना आहे. यासाठी उद्योग विभागासह कौशल्य, रोजगार उदयोजकता आणि नावीन्यता विभाग, माहिती- तंत्रज्ञान यांच्यासह इतर विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. ‘महाहब’मध्ये प्रामुख्याने उद्योग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याचे काम करण्यात येईल. ‘महाहब’ हे प्रामुख्याने स्टार्टअप सुरु करणारे उद्योजक, संशोधक, शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार यांना उपयोगी पडणार आहे. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध मान्यता, आवश्यक बैठका, चर्चासत्र, परिषदा याचे आयोजन आणि समन्वय या महाहब मार्फत करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने फिनटेक, डेटा सेंटर्स, औषधी कंपन्या, वाहन उद्योग, उत्पादन यांचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी श्रीकांत शिंदे हे प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाना आता यश मिळाले असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या निधीस तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार आहे. ‘महाहब’ नाविन्यपूर्ण आराखडयानुसार यामध्ये वन स्टॉप शॉप ही प्रमुख कल्पना आहे. यामध्ये विविध संसांधनासह इको सिस्टीम कार्यालये, कार्यालयासाठी आवश्यक जागा, क्षमता बांधणी, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, निधी, कायदेशीर तसेच आर्थिक बाबींमधील निपुणता, कौशल्य बांधणी, सॉफ्ट आणि हार्ड टेक्नॉलॉजीमधील पायाभूत सुविधा, संस्थात्मक भागीदारी यावर भर असणर आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading