कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम 90 टक्के पूर्ण – उर्वरित कामासाठी उद्या रात्री पुन्हा मेगाब्लॉक

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम आज 90 टक्के पूर्ण झाले. उर्वरित 10 टक्के कामासाठी तसेच पुलाच्या नियोजित कामात खंड पडू नये यासाठी खासदार शिंदे यांनी तत्काळ मेगाब्लॉक देण्याची विनंती रेल्वे डीआरएमकडे केली होती त्यानुसार रेल्वेकडून सोमवार तारीख 23 नोव्हेंबर रोजी रात्री मेगाब्लॉक निश्चित करण्यात आला आहे अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याणच्या पत्रीपुलावर ७६.६७ मीटर लांबीचा ७३० मेट्रिक टन क्षमतेचा एकसंध गर्डर बसविण्याचे काम करण्यासाठी रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. ८ तासाच्या या मेगाब्लॉक मध्ये गर्डर दोन खांबांवर बसविण्याचे तर त्यानंतरच्या शनिवार रविवारी या गर्डरचे फिक्सेशन करत त्यावर प्लेट, कॉंक्रीट टाकण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी आजच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या मेगाब्लॉक दरम्यान गर्डर लोन्चींगचे काम होणे आवश्यक होते. आज रविवार असल्यामुळे सकाळी ९.४५ वाजता काम सुरु करण्याची रस्ते विकास महामंडळाकडून तयारी करण्यात आली होती. मात्र मेगाब्लॉक सुरु होण्यापूर्वी कल्याण स्थानकातून मार्गस्थ होणारी उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन दादर स्थानकात फेल झाल्यामुळे मेगाब्लॉक सुरु होण्यास अर्धा तासाहून जास्त कालावधी लागला. यांनतर उर्वरित ३६ मीटर लांबीच्या गर्डर ढकलण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र गर्डर लिंचवायरवरून पुश थ्रू होताना आजूबाजूला सरकत असल्याने तो पुन्हा मूळ स्थानावर आणत ढकलण्यात टप्याटप्प्यावर अडचणी येत असल्याने आज २ तासाच्या मेगाब्लॉक मध्ये १८ मीटर गर्डर ढकलला गेला मात्र दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वेसेवा सुरु करण्यात आल्यामुळे १८ मीटर गर्डरचे काम रखडले. हा गर्डर बसविण्यासाठी आणखी एका मेगाब्लॉकची गरज असल्यामुळे रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासह रेल्वेच्या अधिकार्यांना आज रखडलेला मेगाब्लॉक पुढील दोन दिवसात देण्याची मागणी केली. रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांच्याशी चर्चा करत सोमवारी रात्रीचा १ तासाचा मेगाब्लॉक निश्चित केला असून उद्या रात्री उर्वरित गर्डर निश्चित जागी बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर पुढील शनिवार रविवारी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या मेगाब्लॉकच्या काळात या गर्डरचे टेकू हटवून पुलाच्या खांबावर हा गर्डर बसविला जाईल. त्याचबरोबरच पुलावरील कॉन्क्रीटच्या कामासह जोडरस्त्याचे काम सुरु केले जाणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading