सोनसाखळी चोरी करणा-या ५ चोरांना ग्रामीण पोलीसांनी केली अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या असून वेगवेगळ्या गुन्ह्यात ५ जणांना अटक केली आहे. एका पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, शहापूर, मुरबाड, गणेशपुरी परिसरात सोनसाखळी चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. मीरा-भाईंदर परिसरात नेमण्यात  आलेल्या पथकानं क्लोज सर्कीट कॅमे-याच्या चित्रीकरणावरून तपास करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चोरी करण्याच्या पध्दतीवरून सोनसाखळी चोरणारा आरोपी हा परशुराम सॅलियन असल्याचं निष्पन्न झालं. त्याला आणि त्याचा साथीदार आनंदकुमार सिंग अशा दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांनी १८ गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून १३ लाख रूपयांचे ४४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. शहापूर, मुरबाड, गणेशपुरी विभागातील पथकानं खर्डीमध्ये राहणारा कुंजल सांडे हा सोनसाखळी चोरी करतो अशी माहिती मिळाल्यामुळं त्याला आणि त्याचे सहकारी गोविंद धमके, विजय सातपुते अशा तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी ९ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून १९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५ दुचाकी असा ७ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ठाणे ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, शहापूर, मुरबाड, गणेशपुरी परिसरातील सोनसाखळी चोरी करणा-या एकूण ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे २३ गुन्हे, दुचाकी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. एकूण ६३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ दुचाकी असा एकूण २० लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती शिवाजी राठोड यांनी दिली.

Leave a Comment

%d bloggers like this: