भीक ते शिक, पूलाखाली भूतं ते रोबोटिक, कंटेनर वर्ग ते मॉडेल स्कूल असा अवघ्या अडीच वर्षांचा विलक्षण प्रवास मुक्काम पोस्ट तीन हात नाका या विशेषांकाच्या माध्यमातून उद्या उलगडला जाणार असून यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेतारा उपस्थित राहणार आहेत. रस्त्यावरील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी मॉडेल असावे असा विचार करून गेली अडीच वर्ष सिग्नल शाळेच्या उपक्रमात विविध प्रयोग करण्यात येत होते. ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या या प्रयत्नांना आता यश मिळत असून मुख्यमंत्र्यांनी देखील शाळेच्या या प्रयोगाला राज्यभर राबवण्याबाबत चाचपणी करण्याची भूमिका अधिवेशनात मांडली आहे. या पार्श्वभूमीवर सिग्नल शाळा उपक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनचा प्रवास शब्दबध्द करण्याचा प्रयत्न मुक्काम पोस्ट सिग्नल शाळा या विशेषांकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या विशेषांकाचं प्रकाशन उद्या संध्याकाळी ५ वाजता सिग्नल शाळेत होत आहे. या प्रकाशन सोहळ्यास अनेक सिने कलाकार उपस्थित राहणार आहेत. मुक्काम पोस्ट तीन हात नाका या अंकाचे मानद संपादक अभिजित पानसे आहेत. या विशेषांकात शाळेत राबवलेले विविध उपक्रम आणि शैक्षणिक प्रयोगासंबंधित २० लेख आहेत. त्याचबरोबर सिग्नल शाळेच्या मुलांच्या कविता, निबंध आणि चित्र देखील आहेत.
