पुरवणी भरणावळ मोबदला मिळत नसल्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी येत्या २६ ऑक्टोबरपासून पुरवणी न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी वर्तमानपत्रांनी पुरवणीचे १० पैसे तर इंग्रजी वर्तमानपत्रांनी पुरवणीचे २० पैसे द्यावे अन्यथा पुरवणी भरून द्यावी अशी वृत्तपत्र विक्रेत्यांची मागणी होती. गेले काही महिने या विषयावर विविध विक्रेता संघटनांच्या प्रतिनिधींशी वर्तमानपत्रांची चर्चा सुरू होती. १ एप्रिल पासून भरणावळ मोबदला वाढणे अपेक्षित होते. पण गेले ६ महिने यावर निर्णय न झाल्यामुळे आता येत्या २६ ऑक्टोबरपासून पुरवणी न टाकण्याचा निर्णय वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्व संघटनांनी घेतला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना पुरवणी भरण्याचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
