वाहनांच्या मालकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांची गाडी घेऊन पळून जाणा-या आरोपीस वागळे इस्टेट पोलीसांनी अटक केली आहे. अश्फाक नूर यानं आपल्या गाडीचे हफ्ते भरतो सांगून आपली गाडी नेली असून आता तो फरार आहे. त्याचा मोबाईलही बंद असून त्याचा ठावठिकाणाही सापडत नाही अशी तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात केली होती. वागळे पोलीसांनी याप्रकरणी चौकशी केली असता त्यांना या गुन्ह्यातील आरोपी हा दहीसर पोलीस ठाण्यात अटक असल्याचं समजलं. त्याप्रमाणे त्याची चौकशी केली असता त्याने पळवून नेलेली गाडी गुजरातला विकल्याचं सांगितलं. पोलीसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने मुंब्र्यातील टाटा, फोर्ड, स्विफ्ट डिझायर, मुलुंडमधील अक्सेंट गाडी अशाच प्रकारे फसवणुकीतून नेल्याची कबुली दिली. गाडीच्या मालकांना गाठून तुमची गाडी भाडेतत्वावर लावून देतो त्याचे हफ्ते भरतो आणि गाडी कर्जमुक्त करून देतो असं सांगून नूर गाडीच्या मालकाचा विश्वास संपादन करत असे आणि गाडी मिळाल्यानंतर काही गाड्यांचे नंबरप्लेट आणि काही गाड्यांचे रंग बदलून परराज्यात स्वस्त किंमतीत विकत असे. याप्रकरणात चार जणांचे एक रॅकेट असून दोन आरोपी कारागृहात तर एकजण फरार आहे. दहीसर पोलीसांनी नूरकडून ५ गाड्या तर वागळे पोलीसांनी ४ गाड्या हस्तगत केल्या आहेत.
