राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्याच्या ७ प्रकल्पांपैकी २ प्रकल्प सिंघानिया हायस्कूलचे

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर इथे होत असून या परिषदेत जिल्ह्याचे ७ प्रकल्प निवडण्यात आले आहेत. काल एका पत्रकार परिषदेत जिज्ञासाच्या सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं यंदाचं हे २६वं वर्ष आहे. यावर्षी स्वच्छ, हरित आणि आरोग्य संपन्न देशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना हा विषय आहे. जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था राज्यातील बालविज्ञान परिषदेची समन्वयक संस्था म्हणून गेली २२ वर्ष काम पाहत आहे. वैज्ञानिक पध्दतीनं बालवैज्ञानिकांनी केलेले संशोधनात्मक प्रकल्प हे बालविज्ञान परिषदेचं खास वैशिष्ट्य आहे. या संशोधनातून भावी संशोधक निर्माण होत आहेत. बालविज्ञान परिषदेसाठी राज्यातून साधारण १८०० प्रकल्प सादर करण्यात आले होते. यामधील जिल्हास्तरावरून १५६ प्रकल्प राज्य पूर्व चाचणीसाठी निवडले गेले होते. त्यातील ७४ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड झाली. उस्मानाबाद इथे झालेल्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेतून ३० प्रकल्पांची निवड राष्ट्रीय परिषदेसाठी झाली असल्याचं सुरेंद्र दिघे यांनी सांगितलं. या ३० जणांच्या चमूमध्ये २० मुली, १० मुलं असून शहरी भागातील २१ तर ग्रामीण भागातील ९ शाळांचा समावेश आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाचे २१ विद्यार्थी असून मराठी माध्यमाचे फक्त ९ विद्यार्थी आहेत. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्याचे सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्प असून मुंबई पूर्व उपनगर ५, पुणे ५, पश्चिम उपनगर, रायगड प्रत्येकी ३, रत्नागिरी आणि उस्मानाबाद यांचे प्रत्येकी २ तर कोल्हापूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाल्याचं सुरेंद्र दिघे यांनी सांगितलं. लहान आणि मोठ्या गटातून प्रत्येकी १ प्रकल्प जानेवारीत होणा-या इंडियन सायन्स काँग्रेससाठी निवडण्यात आला आहे. लहान गटामध्ये हा मान सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलला तर मोठ्या गटामधून खालापूर येथील रिलायन्स फौंडेशन शाळेची निवड झाल्याचंही सुरेंद्र दिघे यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: