राष्ट्रवादी काँग्रेसकडून सापत्न वागणूक मिळत असल्यानं ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांचा निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम न करण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सापत्न वागणूक देत असल्यानं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं काम न करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. या आशयाचं पत्र काँग्रेसच्या सर्व ब्लॉक अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत, उलट अपमानास्पद वागणूक देतात असं काँग्रेस ब्लॉक अध्यक्षांचं म्हणणं आहे. गणेश नाईक पालकमंत्री असताना काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याला एसईओ पद मिळालं नव्हतं. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुभाष कानडे यांचं नाव आणि छायाचित्र कोणत्याच बॅनरवर नव्हते. स्थानिक काँग्रेसला विश्वासात न घेता तत्कालीन काँग्रेस श्रेष्ठींनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला आंदण दिला. त्याचप्रमाणे ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी केल्यानं काँग्रेस पिछाडीवर गेली अशी अनेक उदाहरणं देऊन पक्षश्रेष्ठींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळावा अशी मागणी सर्व ब्लॉक अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यानं निवडणूक प्रचार प्रक्रियेवर बहिष्कार घालून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा निषेध करत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading