राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस वाहकाला एका दाम्पत्यानं मारहाण करण्याचा प्रकार खोपट बस स्थानकात घडला आहे. श्रीवर्धन आगाराचे वाहक ज्योतिबा दराडे हे नालासोपारा ते श्रीवर्धन ही बस घेऊन श्रीवर्धनकडे निघाले होते. पहाटे पावणेसातच्या सुमारास बस खोपट आगारामध्ये आली असताना प्रशांत गांधी या ज्येष्ठ आजारी गृहस्थांना घेऊन त्यांचा मुलगा राज आणि सून सई हे दाम्पत्य बसमध्ये चढले. या दाम्पत्याने वडीलांना वाहकाच्या सीटवर बसवून वाहक दराडे यांना वडील आजारी असून त्यांना उठवू नका असे बजावले. त्यावेळी दराडे यांनी ही जागा वाहकासाठी राखीव असून वडीलांना बसमधील मागच्या रिकाम्या जागेवर बसण्याची विनंती केली. याचा राग आल्याने राज यांनी दराडे यांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. डोकं आणि पोटावर लाथा-बुक्के मारल्यानंतर राज हे दगड घेऊन मारण्यास धावले असता दराडे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या करंगळीला लागलं. राज यांच्या पत्नी सई यांनीही बसमध्ये चढून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत आपल्या खाजगी वाहनातून पळ काढला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
