मुंब्र्यातील ३ सोनारांना बंगळुरू पोलीसांनी अटक करून नेलं असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं मुंब्रा-कौसा ज्वेलर्स असोसिएशननं तीन दिवसांपासून बंद पाळला आहे. मुंब्रा येथील नवकार ज्वेलर्स आणि मीरा ज्वेलर्सचे मालक नेमीचंद, दीपककुमार आणि यवराज कुमार यांच्या दुकानावर शनिवारी संध्याकाळी बंगळुरू पोलीसांनी अचानक छापा मारला आणि या तिघांनाही आपल्या ताब्यात घेतलं. मुंब्रा-कौसा ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांनी बंगळुरू पोलीसांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांना ठाणे गुन्हे शाखेत येण्यास सांगण्यात आलं. पदाधिकारी तिथे गेले असता त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आलं. मुंब्रा येथे पदाधिकारी आले असता या तिघांना बंगळुरू येथे नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या तिघांच्या सुटकेसाठी नातेवाईक बंगळुरूला गेले असता त्यांच्याकडे ६ किलो सोन्याची मागणी करण्यात आली असा आरोप मुंब्रा-कौसा ज्वेलर्स असोसिएशननं केला आहे. यामुळं संतप्त झालेल्या सोनारांनी गेल्या तीन दिवसापासून बंद पाळला आहे.
