मुंबई नाशिक एक्सप्रेस वे वरील पडघा ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था लवकरच दूर होणार

मुंबई नाशिक एक्सप्रेस वे वरील पडघा ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था लवकरच दूर होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तसे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सेवारस्त्याचे काम तसंच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली असून वाहन धारकांना तसंच ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या रस्त्यावर पडघा येथे गेल्या ८ वर्षापासून टोल वसुली सुरू आहे. टोल वसूल करणा-या कंपनीनं करारानुसार वेळच्या वेळी खड्डे भरणे, अंडरपास, सेवा रस्ता आणि उड्डाणपूलाची कामं केली नसल्यानं आत्तापर्यंत या महामार्गावर ६०० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळं ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचं वातावरण होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी आवरे येथील दोन बालकांना खड्ड्यांमुळे बळी गेल्यानंतर शिवसेनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार २१ सप्टेंबरला शिवसेनेच्या ग्रामीण शाखेच्या वतीनं टोल बंद आंदोलन करण्यात आलं. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी टोल कंपनीचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिका-यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर सेवा रस्त्याचं काम तातडीनं हाती घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी याबाबत कडक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. सेवा रस्त्याचं काम तातडीनं सुरू करून महिनाभरात अंडरपासचे काम सुरू करण्याचे तसंच मंजुरी मिळालेल्या सहा उड्डाणपूलांबरोबर उरलेल्या अन्य उड्डाणपूलांची मंजुरी मिळवून त्यांची कामं तीन महिन्यात सुरू करण्याचे मान्य केले.

 

Leave a Comment

%d bloggers like this: