मध्यप्रदेशातून मुंबईत निघालेल्या आणि रिकाम्या दिसणा-या ट्रकमध्ये ५१ लाखांचा मद्य साठा

मध्यप्रदेशातून मुंबईत निघालेल्या आणि रिकाम्या दिसणा-या ट्रकमध्ये ५१ लाखांचा मद्य साठा आढळला आहे. राज्यात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागानं शिताफीनं पकडली असून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक आणि कोकण विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून ट्रकचालक संतोष सिंग याच्यासह कारमधील नामदेव खैरे आणि सुविनय काळे अशा तिघांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागास आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश निर्मित मद्य मुंबईत विक्रीसाठी अवैधरित्या आणलं जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहापूर जवळील कसारा घाटातील खर्डी गावात सापळा रचण्यात आला होता. परंतु नाकाबंदीत पकडलेला १० टायरचा ट्रक रिकामा आढळल्यानं माहिती चुकीची ठरली होती. मात्र पथकातील चाणाक्ष अधिका-यांची नजर ट्रकमधील छुप्या कप्प्याकडे गेली आणि मद्य तस्करीचा भांडाफोड झाला. ट्रकच्या मागील भागात सुमारे ५ फूट लांबीच्या कप्प्यात मद्याचे ४०० बॉक्स आढळले. याप्रकरणी हे ४०० बॉक्स आणि चार चाकी वाहनासह एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मद्य साठा विक्रीस आणला असल्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: