बायो डायजेस्टर टॉयलेट न बांधताच रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची २५ लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ तर्फे जुलै २०१६ मध्ये २७० टॉयलेटस् बांधली जाणार होती. या टॉयलेटसाठी प्रत्येकी २३ हजार रूपये खर्च होता. यामध्ये रोटरी क्लब ९ हजार तर ठाणे महापालिका १४ हजार रूपये देणार होती. रोटरीनं यासाठी युपीएस जेट एअर एक्सप्रेस कंपनीकडून सीआरएस फंडातून निधी मिळवला होता. हे काम कन्फर्ट एन्व्हायरो सर्व्हीसेसला जानेवारी २०१७ मध्ये देण्यात आलं. यासाठी रोटरी क्लबनं ५० टक्के रक्कम म्हणून २५ लाख ३१ हजार रूपये कंपनीला दिले होते. युपीएस जेट एअर एक्सप्रेस कंपनीला आर्थिक ताळेबंदात याबाबत माहिती द्यायची असल्यामुळं त्यांनी रोटरी क्लबला विचारणा केली. रोटरी क्लबनं कन्फर्ट एन्व्हायरोला याबाबत विचारलं असता या कंपनीनं २७० पैकी ७७ टॉयलेट बांधून झाल्याचं कळवलं आणि यापोटी २१ लाखांचं बीलही सादर केलं. मात्र प्रत्यक्षात फारच कमी टॉयलेट बांधल्याच्या तक्रारी आल्यानंतर याप्रकरणी चितळसर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांकडे तक्रार झाल्यानंतर कन्फर्ट एन्व्हायरोनं ६ लाख आणि ७ लाख ३४ हजार असे दोन धनादेश दिले मात्र त्यापैकी १ वटलाच नाही. रोटरी क्लबनं याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता महापालिकेनं फक्त २७ टॉयलेट बांधली असल्याचं कळवले. एकूणच या कंपनीनं रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची २५ लाख ३१ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
