बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेश रमेशलाल ही व्यक्ती पैसे घेऊन दहावी-बारावीची बनावट गुणपत्रिका तयार करून देत असल्याची माहिती पोलीसांकडे होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनोजकुमार म्हात्रे आणि त्यांच्या पथकानं नालासोपारा येथील शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या राजेश रमेशलाल कडे रोहित सिंग आणि शहनवाझ महम्मद खान अशा दोघांना बनावट गि-हाईक म्हणून पाठवले. त्यांनी रमेशलाल यांच्याकडे शालांत परीक्षेच्या बनावट गुणपत्रिका मिळतील का असं विचारलं. त्यावर रमेशलालनं त्यांना एका गुणपत्रिकेसाठी ३ हजार रूपये लागतील असं सांगितलं. रमेशलालच्या मागणीनुसार त्याला १ हजार रूपये आगाऊ देण्यात आले. त्याने २ तासानंतर गुणपत्रिका मिळतील त्या घेऊन जाण्याचं या दोघांना सांगितलं. ठरल्यानुसार राजेश रमेशलाल बरोबर त्यावेळी आणखी एक व्यक्ती उभी होती. त्याने एक प्लास्टीक पिशवीतून बनावट गुणपत्रिका काढून दिली. त्यावेळी पोलीसांनी या दोघांना रंगेहात पकडले. दुस-या व्यक्तीचे नाव तिलक रमेशलाल असे असून या दोघांची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे आणखी तीन बनावट गुणपत्रिका मिळाल्या. ग्रामीण पोलीसांनी या दोघांना बनावट गुणपत्रिका तयार करण्याप्रकरणी अटक केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: